जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री परिसरात ओबीसी आंदोलकांकडून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सोमवारी सकाळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परवानगी नसताना लाक्षणिक उपोषण सुरू केल्याने पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
यावेळी आंदोलकांनी सरकार हाय हाय, सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, सरकार हमसे डरती है, पलीस को आगे करती है ! अशा घोषणा देत सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
दरम्यान, पोलिसांनी अॅड. मंगेश ससाणे, विठ्ठल तळेकर, बाबासाहेब बटुळे आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीचा मुद्दा
पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता, वाहतुकीला अडथळा तसेच विनापरवाना लाक्षणिक उपोषण या कारणांमुळे आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी आंदोलकांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
जरांगेंचं आंदोलन सरकारने बसवले
यावेळी अॅड. मंगेश ससाणे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ङ्गसरकार हाय हायफ अशा घोषणा देत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सरकारनेच बसवल्याचा आरोप केला. ङ्गसरकार लाचार आहे. जरांगे हे सरकारने बसवलेले आहेत,फ असा आरोप ससाणे यांनी केला. तसेच ओबीसींची काय लायकी आहे, हे सरकार दाखवत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
ओबीसी आंदोलकांना आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आल्याने तसेच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने या कारवाईविरोधात आंदोलकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.